अष्टविनायक नगर, सिन्नर येथे अपूर्ण गटारींचा वाढता धोका; नागरिकांची तातडीची दखल घेण्याची मागणी

अष्टविनायक नगर, सिन्नर येथे अपूर्ण गटारींचा वाढता धोका; नागरिकांची तातडीची दखल घेण्याची मागणी
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी :
सिन्नर शहरातील अष्टविनायक नगर परिसरात सुमारे वर्षभरापूर्वी करण्यात आलेल्या गटार बांधकामातील अनेक चेंबर आजही अपूर्ण अवस्थेत असून काही चेंबरांना झाकणेच नसल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर पुरेसा प्रकाश नसल्यामुळे वाहनचालकांची गाडी या उघड्या चेंबरमध्ये अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
विशेष म्हणजे, अनेक चेंबरभोवती गवत वाढल्यामुळे खड्डा दिसून येत नाही. त्यामुळे अंधारात किंवा पावसाळ्यात परिस्थिती अधिक धोकादायक बनते. आतापर्यंत पायी जाणाऱ्या नागरिकांचे तसेच दुचाकीस्वारांचे अपघात होऊन काहींना रुग्णालयात दाखल करावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक वेळा शालेय विद्यार्थ्यांच्या सायकली या उघड्या खड्ड्यांमध्ये अडकून विद्यार्थी पडल्याचे प्रकार समोर आले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक रहिवाशांनी संबंधित कंत्राटदाराशी अनेक वेळा दूरध्वनीवर संपर्क साधून काम पूर्ण करण्याची मागणी केली; मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार आहे. अपूर्ण चेंबर, झाकण नसलेली गटारे आणि परिसरातील वाढलेले गवत यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
अष्टविनायक नगरमधील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्व अपूर्ण चेंबर पूर्ण करावीत, मजबूत झाकणे बसवावीत, गवत साफसफाई करावी आणि रस्त्यावरील प्रकाशव्यवस्था सुधारावी, अशी नम्र परंतु ठाम मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

