ताजे अपडेट

प्रयोगशीलता आणि संशोधनाची वृत्ती जोपासण्याचा प्रयत्न करा : प्रा.जयंत महाजन

प्रयोगशीलता आणि संशोधनाची वृत्ती जोपासण्याचा प्रयत्न करा : प्रा.जयंत महाजन

देवळाली कँप ।‌ निःपक्ष सत्यगुरु, प्रतिनिधी, दि. ०२ ऑक्टोबर २०२६

आजपासून तुम्ही केवळ एका नवीन अभ्यासक्रमाचा भाग झालेला नाहीत, तर एका सुंदर शैक्षणिक परिवाराचे सदस्य झाला आहात. एम.एस्सी.च्या या प्रवासात तुम्हाला नवीन विषय शिकायला मिळतील, प्रयोगशाळेतील नवनवीन प्रयोग करता येतील, संशोधनाची ओळख होईल आणि त्याचबरोबर आयुष्यभर लक्षात राहतील अशा मैत्रीच्या नात्यांचीही सुरुवात होईल, असे प्रतिपादन दैनिक महासागरचे संपादक प्रा. जयंत महाजन यांनी केले. देवळाली कॅंप येथील एसव्हीकेटी महाविद्यालयात एम.एस्सी.च्या नवीन विद्यार्थ्यांच्या ‘फ्रेशर्स सोहळ्या’त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार होते. यावेळी विज्ञान विभागप्रमुख डॉ. बाळासाहेब पगार, एम.एस्सी. समन्वयक प्रा. अश्विनी कडभाने, परीक्षा विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. भारत शेलके, प्रा. सीमा घरटे, डॉ. प्रेरणा रायते, डॉ. पूनम पाटील, डॉ. साधना मोरे, डॉ. चारुशीला पवार तसेच सूक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्र विभागातील इतर प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

     सूक्ष्मजीवशास्त्र असो किंवा रसायनशास्त्र ही दोन्ही शास्त्रे केवळ पुस्तकांपुरती मर्यादित नाहीत. आपल्या दैनंदिन जीवनापासून औषधनिर्मिती, अन्नप्रक्रिया, पर्यावरण, शेती, उद्योग आणि संशोधनापर्यंत या विषयांचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे या विषयांचा अभ्यास करताना केवळ परीक्षेतील गुणांचा विचार न करता ज्ञान, जिज्ञासा, प्रयोगशीलता आणि संशोधनाची वृत्ती जोपासण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही प्रा. महाजन यांनी केले.

अपयश म्हणजे शेवट नसतो

    अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ. पवार म्हणाले की, एम.एस्सी भाग दोनचे विद्यार्थी म्हणून तुमच्याशी एक विशेष नाते निर्माण करायचे आहे. आम्ही तुमच्यापेक्षा एक वर्ष पुढे आहोत, पण याचा अर्थ आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असा अजिबात नाही. उलट, आम्ही तुमचे सहकारी, मार्गदर्शक आणि मित्र म्हणून सदैव तुमच्या सोबत राहू, असा त्या मागचा हेतू आहे. अपयश म्हणजे शेवट नसतो, तर पुढच्या यशाची तयारी असते.

     प्रयोगशाळेत एखादा प्रयोग फसला म्हणून आपण प्रयोग करणे थांबवत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात आलेल्या अडचणींमुळेही आपण थांबायचे नाही. प्रत्येक अनुभवातून शिकत पुढे जायचे. कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयीन जीवनातील नवीन संधी, शैक्षणिक प्रगती आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या स्वागत समारंभामुळे नवीन विद्यार्थ्यांना विभागातील प्राध्यापक, वरिष्ठ विद्यार्थी आणि सहाध्यायी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सूक्ष्मजीवशास्त्र व रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे स्वागत समारंभ यशस्वी झाला.

संशोधनाची आवड निर्माण करा

   महाविद्यालयीन जीवन हा केवळ पदवी मिळवण्याचा काळ नसतो. हा स्वतःला घडवण्याचा काळ असतो. त्यामुळे अभ्यासाबरोबरच वाचन करा, नवनवीन गोष्टी जाणून घ्या, संशोधनाची आवड निर्माण करा, प्राध्यापकांशी संवाद साधा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करा. फ्रेशर्स पार्टी म्हणजे केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, तर दोन बॅचमधील मैत्रीचा सेतू निर्माण करण्याची सुरुवात आहे. तुम्ही आज आमच्यासाठी ‘फ्रेशर्स’ असलात, तरी उद्या तुम्ही या विभागाची ओळख बनाल. तुमच्या यशाने तुमचे पालक, तुमचे शिक्षक आणि आपला संपूर्ण विभाग अभिमानाने सांगेल ‘हे आमची विद्यार्थी आहेत’. मोठी स्वप्ने पाहा, त्या स्वप्नांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करा आणि स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका.

     तुमचे हे नवीन पर्व ज्ञानाने, मैत्रीने, आनंदाने आणि यशाने भरलेले असो.

प्रा. अश्विनी कडभाने-जाधव (एम.एस्सी समन्वयक)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका