ताजे अपडेट

कर्क रोगाविरोधातील लढ्यात फॅमिली फिजिशियनची भूमिका महत्त्वाची

कर्क रोगाविरोधातील लढ्यात फॅमिली फिजिशियनची भूमिका महत्त्वाची

सिन्नरमध्ये ‘कॅन्सर मेडिकल एम्पॉवरमेंट प्रोग्राम’; ५० डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु, प्रतिनिधी दि १५ सप्टेंबर २०२६ :
कर्करोगाचे लवकर निदान, रुग्णाला योग्य वेळी तज्ज्ञांकडे संदर्भित करणे तसेच उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात फॅमिली फिजिशियनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. याच उद्देशाने सिन्नर येथे ‘Cancer Medical Empowerment Program’ या विशेष वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सिन्नर तालुक्यातील सुमारे ५० डॉक्टरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

इंडियन कॅन्सर सोसायटी (ICS) यांच्या वतीने SMBT Institute of Medical Sciences and Research Centre आणि Sinnar Taluka General Practitioner Association यांच्या सहकार्याने शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी हॉटेल पंचवटी, सिन्नर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
‘कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचार प्रवासात फॅमिली फिजिशियनची भूमिका’ हा कार्यक्रमाचा मुख्य विषय होता. यावेळी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग या तीन महत्त्वाच्या विषयांवर प्रत्यक्ष रुग्णांच्या केसच्या आधारे सखोल चर्चा करण्यात आली. मुंबईतील टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल तसेच SMBT हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभागी डॉक्टरांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर इंडियन कॅन्सर सोसायटीच्या कार्याची तसेच Medical Empowerment Programची माहिती देण्यात आली. डॉ. प्रशांत गाढे आणि डॉ. अश्विनी देशमुख यांनी तज्ज्ञ पॅनेलची ओळख करून देत चर्चेची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाच्या कर्करोगावरील सत्रात डॉ. हरिमाधव, डॉ. किरण राजोळे, डॉ. अंबरिश चॅटर्जी, डॉ. मीरा पांडे आणि डॉ. उज्वला साटगीर यांनी तज्ज्ञ म्हणून सहभाग घेतला. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. अश्विनी देशमुख यांनी केले.
तोंडाच्या कर्करोगावरील सत्रात डॉ. हरिमाधव, डॉ. सुधाकर गोपाराजू, डॉ. अंबरिश चॅटर्जी आणि डॉ. मीरा पांडे यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत गाढे यांनी केले.
केस-बेस्ड चर्चेमुळे सहभागी डॉक्टरांना कर्करोगाच्या रुग्णांचे प्राथमिक स्तरावर मूल्यांकन, संशयास्पद लक्षणांची ओळख, योग्य वेळी तज्ज्ञांकडे संदर्भ देणे, उपचाराच्या विविध टप्प्यांमध्ये फॅमिली फिजिशियनची भूमिका तसेच पॅलिएटिव्ह केअर याबाबत तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष आणि व्यावहारिक मार्गदर्शन मिळाले. प्रत्येक सत्रानंतर प्रश्नोत्तर व अभिप्रायाचे आयोजन करण्यात आल्याने सहभागी डॉक्टरांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.
ग्रामीण आणि निमशहरी भागातील रुग्णांसाठी फॅमिली फिजिशियन हा आरोग्यव्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे कर्करोगाविषयी वैद्यकीय ज्ञान अद्ययावत ठेवणे आणि रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचारव्यवस्थेशी जोडणे या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. डॉक्टरांचा उत्स्फूर्त सहभाग हा कार्यक्रमाच्या यशस्वितेचे द्योतक ठरला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ धन्वंतरी पुरस्कार प्राप्त डॉ. अशोक सोनवणे, आयएमए अध्यक्ष डॉ. डी. एम. गडाख, सिन्नर तालुका वैद्यकीय सेवाभावी संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप गुरुळे, डॉ. संदीप गोळेसर, डॉ. धनंजय बैरागी, डॉ. राजेंद्र कमानकर, डॉ. अमोल मोरे, डॉ. सुप्रिया गुरुळे, डॉ. क्षमा आहेर, डॉ. प्रतिभा केदार, डॉ. रोहिणी सदगीर आणि डॉ. वैशाली सोनवणे यांची विशेष उपस्थिती लाभली.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सरगम जाधव (प्रोजेक्ट मॅनेजर – मेडिकल अफेअर्स, इंडियन कॅन्सर सोसायटी, मुंबई) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार डॉ. अश्विनी देशमुख आणि डॉ. प्रशांत गाढे यांनी मानले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका