त्रिमूर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, चास येथे कोट्यवधींचा अपहार; २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
त्रिमूर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, चास येथे कोट्यवधींचा अपहार; २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सिन्नर : निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी | दि. १२ फेब्रुवारी २०२६, www.nipakshsatyaguru.in
त्रिमूर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., चास (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथे आर्थिक अपहार प्रकरण उघडकीस आले असून संबंधित पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०२३–२०२४ व २०२४–२०२५ या आर्थिक वर्षांच्या लेखापरीक्षणात रु. २,३१,१५,३३०/- इतक्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचे आढळून आले आहे.
लेखापरीक्षणात संस्थेचे संस्थापक चेअरमन तथा संजीवनी पॅथोलॉजी लॅब, ता. अकोले, जि. अहिल्यानगर येथील डॉ. जगन्नाथ वामन सहाणे, व्हाईस चेअरमन श्री. मच्छिंद्र मुरलीधर खैरनार, संचालक मंडळातील श्री. रघुनाथ वामन सहाणे, श्रीमती कांता भागवत कातोरे, श्री. सुदाम श्रीहरी सहाणे, श्री. अण्णासाहेब सोपान खैरनार, श्री. रामदास रंगनाथ भाबड, श्री. गुलाब गंगागिर गोसावी, श्री. सुर्यभान बाबुराव देशमुख, सौ. कमळाबाई बाळासाहेब गडाख, श्री. दादा भाऊराव गायकवाड, तसेच चेअरमन व चास गावचे उपसरपंच श्री. शिवाजी विठोबा खैरनार, व्हाईस चेअरमन श्री. नंदकुमार हरीचंद्र देशमुख, संचालक मंडळातील श्री. सोमनाथ माधव भाबड, श्री. राजेंद्र भागीनाथ खैरनार, श्री. पोपट सोपान खैरनार, श्री. उत्तमराव कारभारी बिडगर, श्री. रामनाथ हरी लोहकरे, सौ. मंगल बाळासाहेब देशमुख, सौ. कल्पना उत्तम गायकवाड तसेच संस्थेचे व्यवस्थापक श्री. सुरेश तुकाराम जगधने यांच्यासह एकूण २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, संबंधितांनी संगनमताने मौजे चास भागातील शेतकरी, दुग्ध व्यवसायिक व मजूर वर्गातील ठेवीदारांच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत त्यांच्या मुदत ठेवींच्या रकमेचा परस्पर अपहार केल्याचा आरोप आहे. या रकमा स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या नावे मालमत्ता व वाहने खरेदीसाठी वापरल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ठेवीदारांना मुदत ठेवी परत करण्यात टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सिन्नर, जि. नाशिक यांच्या आदेशानुसार लेखापरीक्षक श्री. रुस्तम सारंगधर कपाटे यांनी वावी (ता. सिन्नर) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
सदर प्रकरणी गु.र.नं. ००३०/२०२६, दि. ११/०२/२०२६ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१६(४), ३१६(५), ३१८(४), ३१८(३) तसेच महाराष्ट्र ठेवदारांच्या (वित्तीय संस्थांतील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम १९९९ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान मा. श्री. संजय गीते, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सिन्नर तसेच वावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गणेश शिंदे व श्री. प्रमोद सरोवर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, संबंधितांविरुद्ध अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून ठेवीदारांनी आपल्या ठेव रकमेच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
सहकार खात्याच्या तत्पर कारवाईचे तालुक्यातून स्वागत
सिन्नर तालुक्यातील त्रिमूर्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था प्रकरणात सहाय्यक निबंधक मा. संजयजी गिते यांनी गंभीर दखल घेत तात्काळ लेखापरीक्षण, चौकशी आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबविल्याबद्दल तालुक्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सभासदांच्या ठेव रकमेचे संरक्षण व सहकार क्षेत्रातील पारदर्शकता अबाधित ठेवण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयाने दाखविलेली तत्परता ही प्रशंसनीय असल्याचे मत विविध सहकारी संस्था पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व ठेवीदारांनी व्यक्त केले आहे.
सहकार विभागाने कोणतीही दिरंगाई न करता संबंधितांवर कायदेशीर कारवाईस सुरुवात केल्याने सर्वसामान्य ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. अशा प्रकारच्या कारवायांमुळे सहकार चळवळ अधिक सक्षम व शिस्तबद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील विविध स्तरांतून सहकार खात्याचे अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही अशाच कठोर व पारदर्शक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एक-दोन अपवादांमुळे संपूर्ण सहकार क्षेत्र बदनाम होऊ नये : सहकार खात्याचे मत
अलीकडे घडलेल्या काही आर्थिक गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने स्पष्ट केले आहे की, तालुक्यातील बहुतांश सहकारी संस्था उत्कृष्ट व शिस्तबद्ध कामगिरी करत आहेत. एक-दोन अपवादात्मक प्रकरणांमुळे संपूर्ण सहकार क्षेत्राची प्रतिमा डागाळली जाऊ नये, असे मत सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
सहकार खात्याच्या मते, सिन्नर तालुक्यातील बहुसंख्य सहकारी पतसंस्था आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवहार, नियमपालन आणि प्रभावी व्यवस्थापनाच्या जोरावर सभासदांचा विश्वास जपत आहेत. विशेषतः सिन्नर शहरातील अनेक संस्था ठेवी संकलन, कर्जवाटप, वसुली तसेच लेखापरीक्षण या सर्व बाबींमध्ये आदर्श कामगिरी करत असून, जिल्हास्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सहकार ही विश्वासावर आधारित चळवळ आहे. काही ठिकाणी झालेल्या गैरप्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे; मात्र त्याच वेळी प्रामाणिकपणे आणि नियमांनुसार काम करणाऱ्या संस्थांचे कौतुकही तितकेच महत्त्वाचे आहे.”
तालुक्यातील अनेक संस्थांनी तंत्रशुद्ध लेखापद्धती, वेळेवर लेखापरीक्षण, जोखीम व्यवस्थापन आणि पारदर्शक कारभार यांमुळे आर्थिक स्थैर्य साधले आहे. सभासदांच्या हिताचे संरक्षण आणि सहकार मूल्यांची जपणूक हीच खरी ताकद असल्याचे सहकार विभागाने अधोरेखित केले.
दरम्यान, सहकार खात्याने सर्व संस्थांना नियमांचे काटेकोर पालन, अंतर्गत नियंत्रण प्रणाली अधिक मजबूत करणे आणि सभासदांचा विश्वास टिकवून ठेवणे याबाबत सूचना दिल्या आहेत. योग्य देखरेख आणि पारदर्शकतेमुळे सहकार क्षेत्र अधिक सक्षम व विश्वासार्ह राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

