मृत व्यक्तीला हयात दाखवून फेरफार नोंद करण्याचा प्रयत्न? हरकतदारांची चौकशीची मागणी
संगमनेर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी, दि १८ ऑगस्ट २०२६ www.nipakshsatyaguru.in
अकोले तालुक्यातील परखतपूर गावातील गट नं. १८/४ संदर्भातील फेरफार नोंद क्र. ४१८१ मध्ये मधुराबाई यादव देशमुख यांचे नाव हयात असल्याचे नमूद करून वारस नोंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याने या नोंदीस हरकत घेण्यात आली आहे.
नांदुर शिंगोटे, ता. सिन्नर येथील उत्तम यादव देशमुख यांनी परखतपूर सजाचे तलाठी कार्यालयाकडे लेखी हरकत अर्ज साद केला असून, मधुराबाई यादव देशमुख यांचे प्रत्यक्षात निधन झालेले असताना त्यांचे नाव हयात असल्याचे नमूद करण्यात आल्याचा आक्षेप घेतला आहे.
मधुराबाई यादव देशमुख यांच्या मृत्यूची वस्तुस्थिती स्पष्ट असताना त्यांना हयात दाखविण्याचे कारण काय, तसेच फेरफार नोंद क्र. ४१८१ साठी कोणती कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत, याची सखोल पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी हरकतदारांनी केली आहे.
मृत्यू प्रमाणपत्र व इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय फेरफार नोंद क्र. ४१८१ प्रमाणित करू नये, तसेच सर्व संबंधित वारसांना नियमानुसार नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकूनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणीही अर्जाद्वारे करण्यात आली आहे.
या प्रकरणातील कागदपत्रांची महसूल प्रशासनाने निष्पक्षपणे तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि नोंदीमध्ये चुकीची अथवा विसंगत माहिती आढळल्यास नियमानुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी हरकतदार उत्तम यादव देशमुख यांनी केली आहे.