अपघातताजे अपडेट

महाराष्ट्राचा ‘दादा’ हरपला

महाराष्ट्राचा ‘दादा’ हरपला…

सिन्नर | प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाम भूमिका, प्रशासनावर मजबूत पकड आणि निर्णयक्षम नेतृत्व यासाठी ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. ही घटना केवळ दु:खदच नव्हे, तर राज्यासाठी धक्कादायक असून एका कणखर, अनुभवी आणि प्रभावी नेतृत्वाचा अचानक अंत झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

    कामावर निष्ठा, विकासाची तळमळ आणि जनतेशी असलेली थेट नाळ ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ओळख होती. “मी कामाचा माणूस आहे, मला काम सांगा” असे ठामपणे सांगणारे अजित पवार आता कधीच पहाटे उठून कामाला लागलेले दिसणार नाहीत, ही कल्पनाच मन सुन्न करणारी आहे.

    निवडणूक प्रचारासाठी पहाटे बारामतीकडे जात असताना घडलेला अपघात हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी काळजावर घाव घालणारा ठरला. या घटनेची चौकशी होईलच, मात्र राज्याने एका धडाडीच्या, कामाच्या माणसाला गमावले आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी तर हा आघात पायाखालची जमीन सरकवणारा ठरला आहे.

      आर. आर. पाटील, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन यांसारख्या दिग्गजांच्या रांगेतील हे नेतृत्व होते. सुप्रिया सुळे यांचा लाडका भाऊ, पवार घराण्याची कार्यसंस्कृती पुढे नेणारा नेता म्हणून अजित पवार यांनी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे विक्रमी सादरीकरण, राज्याच्या विकासासाठी घेतलेले धाडसी निर्णय, पुणे व आयटी क्षेत्राचा विकास, सिंचन, ऊर्जा आणि सहकार क्षेत्रातील योगदान हे कायम स्मरणात राहील.

    पत्रकारांपासून कधी न पळणारा, उलट प्रश्नांना थेट सामोरा जाणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम, विधानसभेत सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याची नोंद, प्रशासनावर असलेली जरब आणि कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय सहन न करणारा स्वभाव हे त्यांच्या नेतृत्वाचे ठळक पैलू होते.

     खेळ, कुस्ती, कबड्डी यांना प्रतिष्ठा मिळवून देणे असो वा शिवसन्मानासाठी उभे राहणे—अजित पवार नेहमीच पुढाकार घेत. कोरोनाच्या संकटात जबाबदारीने परिस्थिती हाताळणारे हे नेतृत्व होते. अलिकडच्या काळातील त्यांच्या भाषणांतून राजकारणाबाबतचे आत्मचिंतन आणि समाजातील शिक्षण, आरोग्य याविषयीची चिंता स्पष्ट दिसत होती.

     आज हे सगळे थांबले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात शांत झाला आहे. सडेतोड बोलणारा, दिलेला शब्द पाळणारा, रागावणारा पण मनाने माणूस असलेला ‘दादा’ आज आपल्यातून गेला आहे. ते केवळ एका पक्षाचे नेते नव्हते, तर सर्वसामान्यांच्या मनातील आपलेसे नेतृत्व होते.

   त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. हे दु:ख स्वीकारणे अवघड आहे, पण वास्तव टाळता येणार नाही. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक तेजस्वी तारा निखळला आहे.

दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका