नयन निऱ्हाळी यांना इंटरनॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट

नयन निऱ्हाळी यांना इंटरनॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट
टॅक्सेशन व फायनान्शियल अॅडव्हायझरी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल
सिन्नर : निःपक्ष सत्यगुरु, दि. १६ मे २०२६ www.nipakshsatyaguru.in
सिन्नरच्या शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरणारी कामगिरी करत येथील युवा करसल्लागार डॉ. नयन नंदकिशोर निऱ्हाळी यांना इंटरनॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटीमार्फत “डॉक्टर ऑफ फिलॉसॉपी इन टॅक्सेशन अॅण्ड फायनान्शियल अॅडव्हायझरी लिडरशीप” ही मानाची डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. टॅक्सेशन, वित्तीय सल्लागार सेवा आणि नेतृत्व क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही पदवी बहाल करण्यात आली.

दिल्ली येथे अत्यंत दिमाखदार वातावरणात आयोजित विशेष पदवीदान समारंभात अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या उपकुलगुरू अँजेलिना न्गुइन यांच्या हस्ते त्यांना ही डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. या सोहळ्यास देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक व व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. नयन निऱ्हाळी यांनी शैक्षणिक क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती साधली असून त्यांनी जीएसटी प्रॅक्टिशनर (GSTP), एमबीए (GST) तसेच बी.कॉम या पदव्या प्राप्त केल्या आहेत. करसल्लागार क्षेत्रात त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्ती, प्रामाणिक कामकाज आणि प्रभावी नेतृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ते सध्या “ब्लाईंड फ्री इंडिया व्हिजन फाउंडेशन” या सामाजिक संस्थेचे डायरेक्टर म्हणून कार्यरत असून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. तसेच ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स, दि गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन मुंबई, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीवरही ते कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून करसल्लागार क्षेत्रातील अनेक तरुणांना मार्गदर्शन मिळत आहे.
या डॉक्टरेट अभ्यासक्रमासाठी इंटरनॅशनल अमेरिकन युनिव्हर्सिटीचे डॉ. अभिषेक सिंग आणि डॉ. मानसी गंदर यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांच्या यशामागे आजोबा स्व. आनंदराव निऱ्हाळी यांचे संस्कार, वडील नंदकिशोर निऱ्हाळी, आई ज्योती निऱ्हाळी आणि सृष्टी निऱ्हाळी यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन व पाठबळ लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ. नयन निऱ्हाळी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सभापती अॅड. राजेंद्र चव्हाणके, माजी नगरसेवक रामभाऊ लोणारे, मुकेश चव्हाणके, राजीव गुंठे, नंदकिशोर मोरे, धनंजय निऱ्हाळी यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
सिन्नरसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून त्यांच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशामुळे स्थानिक तरुणांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.



