‘सरकारी काम आणि चार महिने थांब’ची मानसिकता आता बदलण्याची गरज

‘सरकारी काम आणि चार महिने थांब’ची मानसिकता आता बदलण्याची गरज
सिन्नरच्या प्रशासनाला गतिमान व नागरिकाभिमुख दिशा देण्याची अपेक्षा
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी, दि २४ ऑगस्ट २०२६
‘सरकारी काम आणि चार महिने थांब’ ही पूर्वीची मानसिकता आता नवीन पिढीच्या युगात निश्चितच चालणारी नाही. तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांना शासकीय सेवा जलद, पारदर्शक आणि वेळेत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, अनेकदा एखाद्या कामासाठी नागरिकांना संबंधित कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागतात. तरीदेखील संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी वेळेत काम पूर्ण करीत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांची नुकतीच उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. सिन्नरमध्ये कार्यरत असताना त्यांनी प्रशासनातील विविध कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यकाळानंतर सिन्नरच्या प्रशासनालाही अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख पद्धतीने काम करण्याची दिशा मिळणे गरजेचे आहे.
महसूल विभागासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे प्रलंबित राहू नयेत, यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या नागरिकाला एका साध्या कामासाठी वारंवार कार्यालयात यावे लागणे, प्रत्येक वेळी नवीन कागदपत्रांची मागणी होणे किंवा ‘साहेब नाहीत’, ‘उद्या या’, ‘पुढच्या आठवड्यात या’ अशा कारणांमुळे काम लांबणीवर पडणे, ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
नागरिकांचा वेळही तितकाच महत्त्वाचा आहे. शासकीय कार्यालयात येणारा प्रत्येक नागरिक आपले काम वेळेत पूर्ण व्हावे, या अपेक्षेने येतो. त्यामुळे संबंधित कामासाठी निश्चित कालमर्यादा, अर्जाची स्थिती आणि जबाबदार अधिकारी याबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे.
सुरेंद्र देशमुख यांच्या पदोन्नतीनिमित्त त्यांचे अभिनंदन होत असतानाच, त्यांच्या कार्यकाळातून सिन्नरच्या प्रशासनाने ‘काम पुढे ढकलण्याऐवजी कामाला गती देणे’, ही कार्यपद्धती आत्मसात करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नवीन पिढीच्या अपेक्षा लक्षात घेऊन सिन्नरच्या प्रशासनाने वेळेत काम, पारदर्शक कारभार आणि नागरिकांना सन्मानाची वागणूक या तीन बाबींना प्राधान्य देण्याची गरज आहे.
‘सरकारी काम म्हणजे विलंब’ ही ओळख बदलून ‘सरकारी काम म्हणजे वेळेत सेवा’ अशी नवी ओळख निर्माण करण्याची वेळ आता आली आहे.



