ताजे अपडेटरोजगार/शिक्षण

सिन्नर येथे सहकारी पतसंस्थांची दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

सिन्नर येथे सहकारी पतसंस्थांची दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

ठेव विमा, यूपीआय डायरेक्ट ऍक्सेस व सिबिल समावेशासाठी लोकसभेत आवाज उठवू – खासदार राजाभाऊ वाजे

सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु | दि. ०२ मार्च २०२६

नाशिक जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. शनिवार दि. २८ फेब्रुवारी २०२६ ते रविवार दि. १ मार्च २०२६ दरम्यान सिन्नर येथील हॉटेल श्रीराम येथे ही कार्यशाळा संपन्न झाली.

ही कार्यशाळा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या., मुंबई, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सिन्नर, सहकार भारती नाशिक व अविष्कार सहकार प्रशिक्षण व संशोधन सहकारी संस्था मर्या., सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

*३४ पतसंस्थांचा उत्स्फूर्त सहभाग*

या कार्यशाळेत एकूण ३४ सहकारी पतसंस्था मर्यादित यांनी सहभाग नोंदविला. तब्बल १४२ प्रतिनिधींमध्ये संस्थांचे चेअरमन, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या प्रतिनिधींमुळे कार्यशाळेला व्यापक व सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

 

*मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन*

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी लोकसभा सदस्य राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब (ओमप्रकाश दादाप्पा) कोयटे, उपाध्यक्ष नारायणशेठ वाजे तसेच सहाय्यक निबंधक संजयजी गिते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

उद्घाटनपर भाषणात खासदार वाजे यांनी सहकारी पतसंस्थांना ठेव विमा संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच यूपीआयसाठी डायरेक्ट ऍक्सेस व सिबिलमध्ये समावेश या मागण्यांसाठी आपण दिल्ली येथे पाठपुरावा करणार असून, लोकसभेत या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवू, अशी ग्वाही त्यांनी दिली. “पतसंस्थांच्या हक्कांसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे; मी संसदेत तुमचा आवाज बनेन,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रशिक्षण केवळ संचालक, अधिकारी व कर्मचारी यांनाच आवश्यक नसून, कर्जदार व जमीनदार यांनाही प्रशिक्षणाची गरज आहे, असे त्यांनी सूचित केले.

अध्यक्षीय मनोगतात काकासाहेब कोयटे यांनी राज्यातील सहकारी पतसंस्थांसमोरील विविध धोरणात्मक व प्रशासकीय प्रश्न मांडले. बदलत्या आर्थिक व कायदेशीर परिस्थितीत पतसंस्थांनी पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सक्षम नेतृत्व, सुयोग्य निधी व्यवस्थापन, कायदेशीर तरतुदींचे पालन आणि सदस्यकेंद्री दृष्टिकोन यामुळे पतसंस्थांचे भविष्य अधिक भक्कम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नवीन सहकार धोरणामध्ये कोणत्या बाबींचा समावेश करावा यासाठी फेडरेशन प्रयत्नशील असून, उपस्थितांनी आपल्या सूचना फेडरेशनकडे पाठवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

स्वागताध्यक्ष नारायण वाजे यांनी आपल्या मनोगतात जिल्हा बँकेमध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली. तसेच अविष्कार संस्थेच्या माध्यमातून अत्यंत कमी खर्चात उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न सतत चालू राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

*कायदे, नियमन व व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन*

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रशिक्षक नवनाथ जगताप यांनी वसुलीसाठी कमी वापरला जाणारा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट कलम १३८ तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम १५६ अंतर्गत १०१ प्रकरणांचे व्यवस्थापन आणि कलम १००/८५ प्रक्रिया यावर सखोल मार्गदर्शन केले.

 

मधुकर बोडके यांनी संस्थात्मक प्रशासन, निधी नियोजन, कर्ज धोरण तसेच विविध परिपत्रकांवर मार्गदर्शन केले.

सुरेखाताई लवांडे यांनी नेतृत्व कौशल्य व त्याद्वारे संस्थेचा विकास कसा साधता येतो, यावर सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

सोनाली तेलंग यांनी सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कुटुंब व्यवस्थापन व त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विविध प्रसंगांच्या उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.

नेटविन कंपनीतर्फे हेमराज साळवे यांनी CBS सॉफ्टवेअर प्रणाली संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच वाल्मीक दराडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) द्वारे पतसंस्था कशा प्रगती करू शकतात, याविषयी सखोल माहिती दिली. नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोनार यांनी गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी, यावर मार्गदर्शन केले.

सोपान थोरात यांनी प्रशिक्षणाची आवश्यकता अधोरेखित करून अविष्कार संस्थेमार्फत माफक दरात दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचे कौतुक केले.

*सहभागींचे मनोगत व समारोप*

प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणानंतर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेतून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे पतसंस्थांचा कारभार अधिक सक्षम, पारदर्शक व शिस्तबद्ध होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर त्वरित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत व अविष्कार संस्थेमार्फत वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, अशा मागण्याही करण्यात आल्या.
“सुदृढ पतसंस्था – सक्षम सहकार” या ध्येयाने आयोजित ही दोन दिवसीय कार्यशाळा नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरली. प्रशिक्षण समाप्तीनंतर उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तरे स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या ३ पुरुष व ३ महिला प्रतिनिधींचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. सर्व प्रशिक्षणार्थींना सहभागाबद्दल प्रमाणपत्र व भेटवस्तूंचे वाटप अविष्कार प्रशिक्षण संस्थेमार्फत करण्यात आले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन महेश कुटे व शोभा वाजे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कांताराम माळी यांनी केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी श्रीमंत पेशवे पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुण वारुंगसे, कांताराम माळी, राजेंद्र घोलप, निमिष लाले, मधुकर कोकाटे, अविनाश कांडेकर व सचिन वाजे तसेच श्रीमंत पेशवे पतसंस्थेच्या कर्मचारी वर्गाने विशेष प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका