सिन्नरच्या मातीतील संघर्षाचा ‘महासागर’: प्रा. जयंत महाजन

सिन्नरच्या मातीतील संघर्षाचा ‘महासागर’: प्रा. जयंत महाजन
प्रा. जयंत महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु, दि. २२ सप्टेंबर २०२६ :
२३ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा आणि विविध क्षेत्रांतील योगदानाचा हा छोटासा मागोवा.
१९९३ पासूनचा सहवास; मैत्री आणि मार्गदर्शनाचा प्रवास
प्रा. जयंत महाजन सर आणि माझी ओळख साधारण १९९३ पासूनची. सिन्नर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्याशी परिचय झाला. पुढे दैनिक ‘सकाळ’च्या माध्यमातून एकत्र काम करण्याची संधी मिळाली. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी मला दैनिक ‘सकाळ’च्या वितरणाच्या कामात सहभागी करून घेतले. त्या काळातील त्यांचा सहवास माझ्यासाठी केवळ कामाचा अनुभव नव्हता, तर जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देणारा होता.
श्रीलेखा पतसंस्थेच्या उभारणीत दाखविलेला विश्वास
सहकार क्षेत्रात एक नामांकित अशी श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून त्यांनी मला व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी दिली. संस्थेच्या माध्यमातून चेअरमनपदाची धुरा सांभाळताना त्यांनी अतिशय कुशलपणे पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराची प्रतिमा निर्माण केली. त्याचबरोबर सर्व संचालकांना त्यांच्या योग्यतेनुसार मानसन्मान देत त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवला. या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जमेची बाजू आहे.
रंगभूमीशीही त्यांचे नाते तितकेच जिव्हाळ्याचे. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ यासह अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. ‘पोलीस डायरी’सारख्या माध्यमातून विविध व्यक्तिरेखा साकारताना त्यांनी आपल्या अभिनयकौशल्याचीही वेगळी ओळख निर्माण केली.
विरोध आणि अडथळ्यांवर जिद्दीने मात
चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या वाट्याला नेहमीच कौतुक येते असे नाही. अनेकदा त्याला विरोधाचाही सामना करावा लागतो. प्रगतीकडे संशयाने पाहणारी मानसिकता, संकुचित विचार आणि व्यक्तिगत मतभेद यांचा सामना करतानाही प्रा. महाजन यांनी आपली भूमिका सोडली नाही.
शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्यकाळात अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. काही प्रसंगी जवळच्या व्यक्तींकडूनही विरोध झाला. मात्र संकटांना त्यांनी अडथळा न मानता पुढे जाण्याची प्रेरणा मानली. त्यांच्या विरोधात कितीही परिस्थिती निर्माण झाली, तरी त्यांनी आपली लेखणी आणि विचार यांची साथ सोडली नाही.
संकटाच्या काळात लाभलेली मित्र-हितचिंतकांची साथ
प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना बदलीच्या माध्यमातून केलेले प्रयत्न, विविध प्रकारचे दबाव आणि प्रतिकूल परिस्थिती यांचा सामना करावा लागला. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी संघर्षाचा मार्ग स्वीकारला. या काळात राजकीय, सामाजिक, उद्योजकीय आणि कायदेविषयक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच मित्र, सहकारी आणि हितचिंतक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यामुळे संकटाच्या काळातही त्यांच्या प्रवासाला आधार मिळत राहिला.
माझ्यासारख्या सहकाऱ्यावर दाखविलेला विश्वास
माझ्यासारख्या विद्यार्थ्याला दैनिक ‘सकाळ’मध्ये काम करत असताना त्यांनी केवळ सहकारी म्हणून नव्हे, तर मित्राप्रमाणे वागणूक दिली. अनेक प्रसंगी त्यांनी दिलेले मार्गदर्शन आणि केलेली मदत ही माझ्यासाठी केवळ उपकार नव्हते; ती त्यांच्या माणुसकीची आणि जिव्हाळ्याची प्रचिती होती.
माणसे जोडण्याची विलक्षण हातोटी
प्रा. महाजन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक ठळक पैलू म्हणजे माणसे जोडण्याची त्यांची विलक्षण हातोटी. सिन्नरपुरते मर्यादित न राहता नाशिक जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही त्यांनी विविध क्षेत्रांतील असंख्य व्यक्तींशी स्नेहाचे संबंध निर्माण केले. राजकारणी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, वकील, शिक्षक, पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिक—प्रत्येकाशी संवाद साधताना त्यांचा आपलेपणा जाणवतो.
माणसे जोडण्यासाठी मोठ्या पदाची किंवा संपत्तीची गरज नसते; आवश्यक असतो तो सुसंवाद, विश्वास आणि मनापासून जपलेला जिव्हाळा. प्रा. महाजन यांनी हीच नाती आयुष्यभर जपली.
पत्रकारितेतील प्रदीर्घ वाटचाल
पत्रकारितेत ‘महासागर’ या दैनिकाचे निवासी संपादक म्हणून कार्यरत असून, यापूर्वी अनेक दैनिकांमध्ये संपादक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
सिन्नरच्या मातीत जन्मलेले हे व्यक्तिमत्त्व आज शिक्षण, पत्रकारिता, सहकार आणि सांस्कृतिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करून उभे आहे. त्यांच्या लेखणीला समाजातील प्रश्नांची जाण आहे, विचारांना वास्तवाची जोड आहे आणि संवादात माणसांशी जोडलेपणाची ऊब आहे. म्हणूनच त्यांचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीच्या यशाची कथा नसून प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःची वाट निर्माण करणाऱ्या जिद्दी माणसाची कहाणी आहे.
संघर्ष, विचार आणि माणुसकीचा ‘महासागर’
सिन्नरच्या मातीत जन्मलेला, संघर्षातून घडलेला, वाचन-विचारातून समृद्ध झालेला, असंख्य माणसांच्या स्नेहातून बहरलेला आणि आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिलेला हा ‘महासागर’ भविष्यातही समाजाला विचारांची दिशा देत राहो.
प्रतिकूलतेला संधीमध्ये रूपांतरित करण्याची जिद्द, संकटांसमोर न झुकण्याचे धैर्य, माणसे जोडण्याची कला आणि लेखणीशी असलेली निष्ठा—प्रा. जयंत महाजन यांच्या या गुणांना मनःपूर्वक सलाम!
प्रा. जयंत महाजन सरांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
त्यांना उत्तम आरोग्य, आनंद, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून समाजोपयोगी कार्याची अखंड वाटचाल घडत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
– कांताराम माळी, सिन्नर
(लेखक – निःपक्ष सत्यगुरु चे मुख्य संपादक आहेत.)



