डॉ. राजेंद्र चंद्रभान कमानकर यांचा गजलक्षेत्रातील उल्लेखनीय सन्मान

डॉ. राजेंद्र चंद्रभान कमानकर यांचा गजलक्षेत्रातील उल्लेखनीय सन्मान
भाईंदर येथे ‘गजलाचल’ गजलसंग्रहाचे प्रकाशन; डॉ. कमानकरांची गजल संग्रहात समाविष्ट
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी, दि ०१ सप्टेंबर २०२६
ज्येष्ठ गजलकार व शिक्षणतज्ज्ञ डॉ. लक्ष्मण शिवणेकर संपादित ‘गजलाचल’ या अक्षरगणवृत्तबद्ध गजलसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच भाईंदर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या संग्रहात डॉ. राजेंद्र चंद्रभान कमानकर यांच्या गजलेचा समावेश करण्यात आला असून, यानिमित्ताने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

गजल तंत्राच्या दृष्टीने कोणतीही सूट न घेता लिहिलेल्या तंत्रशुद्ध अक्षरगणवृत्तबद्ध गजलांचा संग्रह हे ‘गजलाचल’चे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मराठी गजल इतिहासातील हा दुसरा, तसेच गेल्या ४० वर्षांतील पहिला अक्षरगणवृत्तबद्ध गजलसंग्रह असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या संग्रहात आपली गजल समाविष्ट झाल्याबद्दल डॉ. राजेंद्र कमानकर यांनी आनंद व्यक्त केला. या निमित्ताने ज्येष्ठ व श्रेष्ठ गजलकारांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळाली, नवीन साहित्यिकांशी परिचय झाला तसेच आगळ्यावेगळ्या गजल मुशायऱ्यात सहभागी होऊन स्वतःची गजल सादर करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. राजेंद्र चंद्रभान कमानकर यांच्या या साहित्यिक योगदानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



