सहकार आणि आरोग्याचा दुहेरी संगम! सिन्नरमध्ये ‘सहकार सप्ताह – २०२६’ अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

सहकार आणि आरोग्याचा दुहेरी संगम! सिन्नरमध्ये ‘सहकार सप्ताह – २०२६’ अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु, प्रतिनिधी, दि. ०६ जुलै २०२६, www.nipakshsatyaguru.in
केवळ आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील ज्ञान अद्ययावत करण्यावर न थांबता, सामाजिक भान जपत आरोग्य विषयक जनजागृतीचा प्रभावी संदेश देणारी एक दिवसीय कार्यशाळा सिन्नर येथे नुकतीच पार पडली. सहकार सप्ताह-२०२६ च्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यशाळा व प्रश्नमंजुषा कार्यक्रमाला तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सहकार मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था, सिन्नर), सहकार भारती, नाशिक, श्रीलेखा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, आविष्कार सहकारी संस्था व संशोधन संस्था, आणि लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. ०६ जुलै २०२६ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नोंदणी व चहापानानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचे शानदार उद्घाटन झाले.

सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत सहकार क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीवर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला. सहाय्यक निबंधक मा. संजयजी गीते यांनी कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट करत कर्ज वसुली संदर्भात घ्यावयाच्या काळजीवर योग्य

मार्गदर्शन केले. सनदी लेखापाल (CA) मा. अरुणजी डावरे यांनी आयकर कायद्यातील अद्ययावत बदल व त्याचे पतसंस्थांवर होणारे परिणाम यावर सविस्तर माहिती दिली. तालुका लेखापरीक्षक मा. दीपकजी सावंत यांनी लेखापरीक्षणपूर्व तयारीबाबत, तर दुपारच्या सत्रात मा. हरिभाऊ वाकचौरे यांनी सहकारी संस्थांमधील कामकाजातील बदल व आदर्श कार्यपद्धती यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सहकार सप्ताहानिमित्त संचित नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सेल्फी पॉईंटची आकर्षक व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आरोग्य जनजागृती व प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सहकारासोबतच या कार्यशाळेत आरोग्यालाही विशेष महत्त्व देण्यात आले. प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत गाढे यांनी सर्पदंश, हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आणि अशा वेळी करावयाचे तातडीचे प्रथमोपचार यावर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली. उपस्थितांनीही विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. याशिवाय सहकार चळवळीचे महत्त्व आणि संकल्पना यावर आधारित ‘प्रश्नमंजुषा’ कार्यक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

मान्यवरांची उपस्थिती व आयोजकांचे परिश्रम
याप्रसंगी सर्वश्री. नारायणशेठ वाजे, सहकार अधिकारी सुदर्शन तांदळे, नवनाथ गडाख, बी. एम. पवार, बी. आर. चव्हाण, महेश कुटे, कांताराम माळी, राजेंद्र घोलप, मधुकर कोकाटे, सचिन वाजे यांच्यासह सिन्नर तालुक्यातील नामवंत पतसंस्थांचे व्यवस्थापक, कार्यवाहक व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेला महिला अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या नूतन सचिव ला. सौ. वैशाली सानप, ला. सौ. संगीता वाजे, ला. सौ. मीनाक्षी भरीतकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

संपूर्ण कार्यशाळा अत्यंत शिस्तबद्ध व ज्ञानवर्धक वातावरणात पार पडली. या कार्यशाळेमुळे सहकारी संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमतेत वाढ होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व
आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविष्कार सहकारी संस्था व संशोधन संस्थेचे सचिव महेश कुटे यांनी केले. शेवटी लायन्स क्लबच्या सचिव सौ. वैशाली सानप यांनी सर्व मान्यवर, सभासद आणि नागरिकांचे आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले.


