सिन्नर मध्ये जनगणना तयारीसाठी प्रशिक्षणाला सुरुवात

सिन्नर मध्ये जनगणना तयारीसाठी प्रशिक्षणाला सुरुवात
नगरपरिषदेच्या उपक्रमात प्रगणक व पर्यवेक्षकांचा सहभाग
सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु : www.nipakshsatyaguru.in
सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने आगामी जनगणना–२०२७च्या पार्श्वभूमीवर प्रगणक व पर्यवेक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमास २३ एप्रिल २०२६ पासून सुरुवात करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण २५ एप्रिलपर्यंत चालणार असून दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत चांदक कन्या विद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमास चार्ज अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अभिजीत कदम तसेच उपचार्ज अधिकारी आणि सहाय्यक चार्ज अधिकारी दीपक बागल, तसेच फील्ड ट्रेनर गोरख मानगावकर व प्रफुल्ल पाटील उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत जनगणना प्रक्रियेमधील अचूकता व जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रशिक्षणादरम्यान जनगणना फॉर्म भरण्याची पद्धत, मोबाईल अॅपचा वापर, स्कॅनिंग प्रक्रिया तसेच क्षेत्रीय कामकाज याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे. प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांकडून गोपनीयतेची शपथ घेण्यात आली.
जनगणना प्रक्रियेत गोपनीयतेचे नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणास उपस्थित राहणे अनिवार्य असून, अनुपस्थित राहणाऱ्यांवर जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
सिन्नर नगरपरिषदेच्या माध्यमातून जनगणना प्रक्रिया पारदर्शक व प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत असून, या प्रशिक्षणामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



