ताजे अपडेट

पोपटराव सावंत म्हणजे शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला नेता

पोपटराव सावंत म्हणजे शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला नेता

सिन्नर | निःपक्ष सत्यगुरु प्रतिनिधी, दि.१० ऑगस्ट २०२६, www.nipakshsatyaguru.in

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व स्वर्गीय शरद जोशी यांचे निकटवर्तीय पोपटराव माधवराव सावंत (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने आज पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शेतकरी संघटनेचा एक सच्चा पाईक गेल्याची प्रतिक्रिया राज्यभरातून उमटत आहे. स्व. सावंत हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रूंभोडी येथील रहिवासी. राज्यभर शरद जोशी यांच्या काळात शेतकरी संघटनेने जोर धरल्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील संपूर्ण जबाबदारी सावंत यांच्यावरच होती. याशिवाय राज्यभरातील आंदोलनात ते सहभागी होत असे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, हंसराज वडघुले, माजी मंत्री आ. सदाभाऊ खोत, आक्रमक शेतकरी नेते रविकांत तुपकर, संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख राकेश टिकैत, ज्येष्ठ संपादक व शेतकरी नेते प्रकाश पोहरे, अजित काळे, अनिल औताडे, युवराज जगताप, दशरथ सावंत आदींनी पोपटराव सावंत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रचंड उपस्थितीत त्यांच्या मूळ गावी रूंभोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात रत्नाकर, अण्णासाहेब, भालचंद्र, चंद्रशेखर ही चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

संपूर्ण हयात शेतकरी संघटनेच्या विचारांशी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी एकनिष्ठ राहणे ही आजच्या काळात अत्यंत दुर्मीळ बाब आहे. सत्ता, पद, प्रतिष्ठा किंवा व्यक्तिगत स्वार्थ यांचा मोह न बाळगता शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या पोपटराव सावंत यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी केवळ व्यासपीठावर मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची त्यांची भूमिका राहिली. शेतमालाला योग्य भाव, उत्पादन खर्चावर आधारित दर, कर्जबाजारीपणातून मुक्ती, वीज-पाणी, बाजारपेठ आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाचा प्रश्न त्यांनी सातत्याने लावून धरला होता. काळ बदलला, राजकीय समीकरणे बदलली, अनेकांनी सोयीप्रमाणे भूमिका बदलल्या; मात्र पोपटराव सावंत यांची शेतकरी संघटनेवरील निष्ठा मात्र अढळ राहिली. संघर्षाच्या काळात कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे आणि शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख. शेतकऱ्यांसाठी लढणे हा त्यांच्यासाठी केवळ राजकीय कार्यक्रम नव्हता, तर तो जीवनाचा ध्यास होता. त्यामुळे त्यांचे योगदान एखाद्या पदाच्या किंवा निवडणुकीच्या यशापयशाने मोजता येणार नाही. त्यांनी उभ्या केलेल्या विचारांची आणि संघर्षाची परंपरा हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे. खरं पाहिले तर निवडणुकीच्या राजकारणापासून आयुष्यभर ते दूर राहिले. आजच्या स्वार्थी राजकारणाच्या काळात संपूर्ण आयुष्य एका विचारासाठी आणि शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी वाहून घेणाऱ्या अशा नेतृत्वाचा मृत्यू होणे ही सामान्य शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अतिशय दुर्दैवी घटना आहे. 

शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही, तर या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, या विचाराने संपूर्ण हयात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे त्यांचे नेतृत्व होते. सत्ता मिळविण्यासाठी नव्हे, तर शेतकऱ्याला त्याच्या घामाचा योग्य मोबदला मिळावा, त्याच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळावी आणि त्याचा आवाज शासनाच्या कानावर पोहोचावा यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आंदोलन असो, मोर्चा असो, निवेदन असो अथवा शेतकऱ्याच्या अडचणीच्या काळात त्याच्या दारात उभे राहणे असो, त्यांची भूमिका नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने राहिली. राजकारणात परिस्थितीनुसार भूमिका बदलणारे अनेक जण पाहायला मिळतात; मात्र विचारांशी आणि शेतकरी संघटनेशी निष्ठा कायम ठेवणारे नेतृत्व काळाच्या ओघात आज आपल्यातून निघून गेले. पद मिळाले नाही म्हणून संघर्ष थांबवायचा नाही आणि सत्ता नाही म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवायची नाही, हा त्यांचा जीवनप्रवास आजच्या पिढीसाठी आदर्श ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करताना त्यांनी अनेक अडचणी सहन केल्या. सर्वात महत्त्वाची म्हणजे पदरमोड करूनच त्यांनी शेतकरी संघटनेचे राजकारण केले. आपल्या हयातीत सर्व नातेवाईकांना जीव लावणे हा तर त्यांचा स्थायीभाव होता त्यामुळेच सर्व नातेवाईक आजही या कुटुंबाशी जोडून आहे त्यांचा आवाज स्वतःसाठी कधीच नव्हता. तो हजारो शेतकऱ्यांच्या, नातेवाईकांच्या वेदनांचा आणि अपेक्षांचा आवाज होता. अनेक शेतकरी नेते आपल्या पाहणीत आलेले असतील. पण एखादा नेता संपूर्ण आयुष्य एखाद्या विचाराला वाहून घेतो, तेव्हा तो केवळ नेता राहत नाही; तो एका चळवळीचा चेहरा बनतो. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्यभर लढलेल्या या लढवय्या नेतृत्वाला सलाम! त्यांचा संघर्ष, त्यांची निष्ठा आणि शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. पोपटराव सावंत या महान व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका